मुंबई, दिल्लीत दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या घटली 

Corona

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असताना देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या महानगरांमध्ये नव्या संक्रमितांची दैनंदिन संख्या कमी होत असलेली दिसून येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या या महानगरांमधील रुग्णसंख्येची घट ही खरी मानायची की चाचण्यांची संख्या घटल्यामुळे वास्तविक रुग्णसंख्या मोजावीच जात नाही; हा कळीचा सवाल बनला आहे.  

दिल्लीमध्ये गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी सर्वाधिक २८ हजार ८६७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र, शुक्रवारी हा आकडा २४ हजार ४८३ वर आला. अर्थात एकाच दिवसात राजधानीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल २० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, गुरुवारी मुंबईत कोरोनाचे १३ हजार ७०२ रुग्ण आढळले, तर शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये १७ टक्क्यांनी घट होऊन नवीन बाधितांची संख्या ११ हजार ३१७ वर आली आहे. या आधीची आकडेवारी बघता मुंबईत नवी रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

ही आकडेवारी वास्तव मानली तर मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सध्या पूर्ण भरात असून ती यापुढील काळात उतरणीला लागण्याचे संकेत या आकड्यातुन मिळतात. त्याचप्रमाणे दिल्लीतही  नवीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या आणि दोन्ही महानगरांमधील चाचण्यांची आकडेवारी याचा तुलनात्मक विचार केला तर दोन्ही ठिकाणी चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. मुंबईत चाचणी सकारात्मकता दरही  (पॉझिटिव्हिटी रेट) सातत्याने कमी होत आहे. दिल्लीत मात्र, हा दर वाढतच आहे. 

मुंबईमध्ये ७ जानेवारी रोजी शहरातील सकारात्मकता दर सर्वाधिक २८.९५   टक्के एवढा होता. अर्थात मुंबईत १०० चाचण्यांमागे २९ लोक कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. मात्र, शुक्रवारी मुंबईचा चाचणी सकारात्मकता दर थेट २०.६  टक्क्यांवर आला आहे. मात्र, उल्लेखनीय बाब म्हणजे शुक्रवारी मुंबईत कोरोनाच्या केवळ ५४ हजार ९२४ चाचण्या झाल्या. ही संख्या आठवड्याच्या कालावधीत सर्वात कमी आहे. 

त्याचप्रमाणे दिल्लीत शुक्रवारी सकारात्मकता दर ३०.६४ टक्के होता. याचा अर्थ दिल्लीत दर १०० चाचण्यांमागे ३०-३१ जणांना संसर्ग होत होता. गेल्या काही महिन्यांत दिल्लीतील चाचणी सकारात्मकतेचा हा उच्चांक आहे. मात्र, शुक्रवारी राजधानीत केवळ ७९ हजार ५७८ चाचण्या झाल्या असताना दिल्लीतील हा उच्च संसर्ग दर नोंदवला गेला. आठ दिवसांतील कोरोना चाचण्यांची ही दुसरी सर्वात कमी संख्या होती.
 

Share this story