तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा धोका अधिक 

Corona

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांनाही कोरोनाची लागण उल्लेखनीय प्रमाणात होत आहे. आधीच्या दोन लाटांपेक्षा या तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर बालकांमध्ये संसर्ग पसरत आहे. बहुतेक कोरोनाबाधित मुलांमध्ये संसर्ग खूप सौम्य असतो, परंतु दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रोगाची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे बाळांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.  

संसर्गग्रस्त मुलांमध्ये 'मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम'चे वाढते प्रमाण आणि खास मुलांच्या देखभालीसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव; हे दोन विषय वैद्यकीय तज्ज्ञांच्या चिंतेचे विषय बनले आहेत. सध्या मुलांसाठी अतिदक्षता आणि अन्य सुविधांवर कोणताही तणाव नाही. मात्र, मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्यास यंत्रणा कोलमडू शकते. विशेषतः लहान मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची देशात कमतरता आहे. 

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने राज्यांना बालरोगविषयक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नुकतेच सांगितले की, केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये घोषणा केल्यानुसार २३ हजार १२३ कोटी रुपयांच्या आपत्कालीन कोविड पॅकेज २ पैकी नियमा निधी राज्यांना सुपूर्त करण्यात आला आहे. या निधीतून मुलांसाठी सुमारे ९ हजार ५७४ 'आयसीयू बेड' तयार केले जातील. देशातील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये मुलांच्या खाटांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात कोविडच्या उपचारासाठी १ लाख ३९ हजार ३०० अतिदक्षता खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी सुमारे पाच टक्के म्हणजे सुमारे २४ हजार ५७ खाटा मुलांसाठी आहेत. देशातील एकूण १८ लाख खाटांपैकी सुमारे चार टक्के खाटा मुलांसाठी आहेत.

एम्सचे वरिष्ठ बालरोगतज्ञ सांगतात की, संसर्गाच्या पहिल्या २ लाटांच्या काळात प्रतिदिन १० पेक्षा कमी बाधित मुले उपचारासाठी येत. यावेळी दिवसाला ४० संक्रमित बालके आढळून येत आहेत. पहिल्या आणि दुस-या लहरीमध्ये अनेक मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले परंतु त्यापैकी बहुतेक जण लक्षणे नसलेले आढळले. तिसऱ्या लहरीमध्ये मुलांमध्ये लक्षणे अधिक दिसत आहेत. सध्या अनेक बालकांना ताप, पोटाचा त्रास यासारखी सौम्य लक्षणे दिसून येत  आहेत. लक्षणांची तीव्रता दोन ते तीन दिवस टिकते. परंतु सध्या तरी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची आवश्यकता असलेल्या बालरुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. 

'मुलांचे लसीकरण वेगाने व्हावे'  

देशभरातील अधिकाधिक मुलांचे शक्य तितक्या लवकर लसीकरण करावे. कोरोना महामारीने अस्थिर झालेले जग पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यासाठी अधिकाधिक लसीकरण हा एक मार्ग आहे. मुलांचे लसीकरणही महत्वाचे आहे. 'कोवॅक्सीन' ही एक सुरक्षित लस आहे, कारण ती पारंपारिक तंत्रज्ञानाने बनवली जाते, असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

Share this story