कवठे गावात साकारतेय प्रवेशद्वार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

kavathe14
दस-यांच्या मुहूर्तावर ५१ ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन

वाई : कवठे ता. वाई थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त किसन वीर यांचे गाव. त्यांच्या स्मृतीस कायमस्वरूपी उजाळा मिळण्यासाठी कवठे ता. वाई येथील आजी माजी शिक्षकांनी कवठे गावाच्या प्रवेशाच्या वेशीवर कै. देशभक्त किसन वीर स्वागत कमान बांधण्याचा निश्चय केला व त्यानुसार आजी, माजी शिक्षक, गावातील इतर व्यावसायिक तसेच माहेरवाशिणी यांना या उपक्रमात सामील करून याकामी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. या शिक्षकांनी केलेल्या निश्चयाला गावानेही मोठ्या प्रमाणात पाठबळ दिल्याने कवठे गावातील स्वागत कमानीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ दस-याच्या मुहूर्तावर करण्याचे ठरले असून कवठे गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गावातील मान्यवरांच्या हस्ते या स्वागत कमानीचे उद्घाटन होणार आहे.

कवठे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सध्या कवठे येथे कोणतीही सोय नसल्याने या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक तयारीसाठी वाई किंवा सातारा येथे जावे लागत असल्याची बाब या आजी माजी शिक्षकांना जाणवल्याने याच दिवशी गावातील युवकांसाठी यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., बँकिंग व संरक्षण दल अश्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अद्यावत ग्रंथालयाचे उद्घाटनसुद्धा याच दिवशी या शिक्षकवर्गाच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक माधवराव डेरे, चंद्रकांत ससाणे, लक्ष्मण कांबळे, आनंदराव डेरे, प्रताप डेरे, जयवंत निकम व श्रीमती शकुंतला पोळ या शिक्षकांच्याद्वारे व सर्व आजी माजी शिक्षक कवठे यांच्याकडून देण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये अद्यावत पुस्तके ठेवण्यात येणार असून वरील सर्व अध्ययन प्रकारासाठी मार्गदर्शक व्यक्तींचे विविध कार्यक्रमाचे आयोजन वेळोवेळी करण्यात येणार आहे. कवठे गावातील आमचा विद्यार्थी गावातून शिक्षण घेवून स्पर्धा परीक्षेंच्या माध्यमातून या केंद्राच्या मदतीने यशस्वी व्हावा व त्याने आपल्या गावाचे नाव उज्वल करावे य उद्देशाने या मार्गदर्शन केंद्रावर नियोजनासाठी संचालक मंडळाची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे. 000

Share this story