विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार 

Virat Kohali

जोहान्सबर्ग/ वृत्तसंस्था 

टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय विराट कोहली याने समाजमाध्यमाद्वारे जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत भारतीय संघाचा २-१ असा मालिका पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर विराटने हा निर्णय घेतला आहे. 

सलग ७ वर्षांपासून मी कर्णधारपदाची जबाबदारी मी अतिशय जबाबदारीने, कष्टाने, परिश्रमपूर्वक पार पाडली आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे आणि त्यात कोणतीही कमतरता राहू दिलेली नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी टप्प्यावर थांबणेच योग्य आहे आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो टप्पा आता आला आहे, असे कोहली याने त्याच्या निवेदनात नमूद केले आहे. 

दीर्घ कालावधीसाठी मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आभार मानू इच्छितो. त्याचप्रमाणे मुख्यतः संघातील माझ्या सहकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून संघाला आणि खेळाला पुढे नेण्यासाठी एक दृष्टीकोन विकसित केला आणि कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानली नाही, अशा शब्दात त्यांनी टीममधील खेळाडूंचेही कौतुक केले.    

Share this story