टीम इंडियाला हुकमी फिरकी गोलंदाजांची गरज: इरफान 

Irfan Pathan

हैदराबाद/ वृत्तसंस्था 

भारतीय क्रिकेट संघात विशेषतः विदेश दौऱ्यावर जाताना कोणत्याही परिस्थितीत हुकमी बाली घेऊ शकणाऱ्या एका 'मनगटी' फिरकी गोलंदाजांची आवश्यकता असल्याचे मत टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने व्यक्त केले. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असता त्यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या ऐतिहासिक मालिका विजयाची अपेक्षा केली जात होती. पहिल्या कसोटीत निर्विवाद विजय मिळवून त्यांनी त्या आशा आणखी पल्लवित केल्या. मात्र, पुढच्या दोन्ही कसोटीत भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांग्या टाकल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

फलंदाजांच्या या सुमार कामगिरीवरही इरफानने कठोर भाष्य केले. या पुढील काळात भारतीय संघाच्या फलंदाजीच्या मधल्या फळीत बदल केले जाण्याची लक्षणे असून ते आवश्यकही आहे, असे त्याने नमूद केले. मात्र, फलंदाजीतील बदलांबरोबरच संघात मनगटाच्या आधारे चेंडू वळविणाऱ्या एका तज्ज्ञ फिरकी गोलंदाजांचा समावेश करावा. तो परदेशातील हवामान आणि खेळपट्ट्या कशाही असल्या तरी काही हुकमी बळी मिळवून संघाला सुस्थितीत ठेवण्याचे काम करू शकेल; असे मत इरफानने व्यक्त केले आहे. 

दक्षिण आफ्रिकेतल कसोटी मालिकेत सुमार फलंदाजीमुळे पाहुण्यांची निराशा झाल्याचे कर्णधार विराट कोहली याने यापूर्वीच मान्य केले आहे. मात्र, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता झाली नाही, त्यावर त्याने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. या दोघांच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचे काम निवड समितीचे आहे. कर्णधाराचे नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. 
 

Share this story