डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर: 'एम्स'

Dr. Manmohan Singh

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेऊन असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांना तीन दिवसापासून ताप येत असून त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याचे 'एम्स'ने म्हटले आहे. 

बुधवारी संध्याकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. सिंग यांना 'एम्स'च्या रुग्णालयात हृदयरोग विभागात दाखल करण्यात आले असून संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. डॉ. सिंग यांना सोमवारपासून ताप असून त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणाही आला आहे, असे 'एम्स'च्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

डॉ. सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या असून त्या निराधार आहेत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माध्यम विभागाचे सह प्रभारी प्रणव झा यांनी ट्विट मार्फत केले आहे. सिंग यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

Share this story