राजधानीत बेवारस बॅगमध्ये स्फोटके; घातपात टळला  

Delhi Bomb

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था  

दिल्लीतील गाझीपूर फूल मंडीमध्ये शुक्रवारी सकाळी एक बेवारस बॅग सापडल्यानंतर खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तपासात पोलिसांना बॅगेतून 'आयईडी' स्फोटक सापडले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता एनएसजी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) पथकाने 'आयईडी'चे प्रमाण लक्षात घेऊन  'जेसीबी'ने खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी करण्यात आला.

दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की विशेष शाखा या प्रकरणाचा तपास करत असून स्फोटक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर, 'एनएसजी'ने माहिती दिली की, पथकाने गाझीपूर फूल मंडी येथून जप्त केलेला आयईडी निकामी केला आहे. आयईडीचे नमुने गोळा करण्यात आले असून ते तयार करताना वापरण्यात आलेल्या रासायनिक घटकांची तपासणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. 

एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या आयईडीचे वजन सुमारे तीन किलो आहे. एनएसजीला सकाळी दिल्ली पोलिसांमार्फत याची माहिती मिळाली. एनएसजीने पहाटे हा बॉम्ब निकामी केला. यावेळी न्यायवैद्यक अधिकारीही उपस्थित होते.
 

Share this story