दल तलावावर रंगणार भारतीय वायुसेनेचा 'एअर शो'

IAF

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

पृथ्वीवर स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या दल जलाशयावरील आकाशात दि. २६ रोजी भारतीय हवाई सेनेच्या मिग २१ आणि सुखोई ३० या लढाऊ विमानांची रोमहर्षक प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. काश्मीरमधील युवकांमध्ये भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुकता निर्माण करणे आणि पर्यटनाला प्रेरणा देणे हे या उपक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख उद्देश असल्याचे काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळ यांनी सांगितले. 

काश्मिरी विद्यार्थी आणि युवकांमध्ये भारतीय सैन्यदलांबद्दल आकर्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या कार्यक्रमांतर्गत पोळ यांनी काश्मीरमधील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या बैठकीचे आयोजन केले. 'गिव्ह विंग्ज टू युअर ड्रीम्स' ही संकल्पना असलेल्या भारतीय वायुदलाच्या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात विभागातील तब्बल ३ हजार विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये आपल्या स्वप्नांना पंख देण्याचे बळ निर्माण होईल. सैन्यदल, वायुसेना, विमानोड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण होईल, असे सांगतानाच पोळ यांनी या उपक्रमाला विशेषतः राष्ट्रीय छत्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना आवर्जून उपस्थित ठेवण्याचे आवाहन केले. शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रावर होणाऱ्या या प्रात्यक्षिकांचा ठिकाणी विविध कक्षांमध्ये भारतीय सेना, वायुसेना, त्यामधील रोजगारांच्या संधी, भरतीसंबंधीचे नियम आणि पात्रता याची सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही पोळ यांनी सांगितले.       

Share this story