पाकिस्तान बनला टॉप १० कर्जबाजारी देशांपैकी एक 

Imran Khan

इस्लामाबाद/ वृत्तसंस्था 

संधी मिळेल तिथे भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेला पाकिस्तान मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड देत असतानाच त्याचा समावेश सर्वाधिक विदेशी कर्ज असलेल्या १० देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात विदेशातून कर्ज उभे करण्यात पाकिस्तानला मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. 

कोरोना महामारीच्या काळात पाकिस्तानच्या डोक्यावरील परकीय कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तान सर्वाधिक कर्जदार १० देशांमध्ये आला आहे. त्यामुळे या देशाचा समावेश 'डेबिट सर्व्हीस सस्पेन्शन इनिशिएटिव्ह'मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला विदेशी कर्जउभारणी मुश्किल होणार आहे. या यादीत समाविष्ट देशांना सर्वसामान्य व्याजदरापेक्षा अधिक दराने कर्ज देण्यात येते. 

'डीएसएसआय'च्या यादीत अंगोला, बांग्लादेश इथिओपिया, घाना, केनिया, मंगोलिया, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबीया या देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचे एकत्रित विदेशी कर्ज सन २०२० अखेरीपर्यंत ५०९ बिलियन डॉलर एवढे आहे. सन २०१९ च्या तुलनेने त्यामध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या कर्जबाजारीपणामध्ये पंतप्रधान इम्रान खान यांचा वाटा ४० टक्क्यांचा असल्याची वृत्त पाकिस्तानात काही काळापूर्वीपासून प्रसिद्ध होत आहेत  

Share this story