पंजाब पुन्हा दहशतवादी विळख्यात 

Punjab Terrorism

अमृतसर/ वृत्तसंस्था 

एकेकाळी खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबला पोलीस आणि लष्करी कारवाया करून काही प्रमाणात शांतता प्रस्थापित करण्यात आली होती. मात्र, हा दहशतवाद पंजाबला पुन्हा आपल्या कराल विळख्यात घेऊ पाहत आहे. गुरुदासपूरमध्ये नुकतेच आरडीएक्स मिळाल्यानंतर आता अमृतसरच्या सीमेलगत असलेल्या धनोआ कलान या गावामध्येही मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा साठा सापडला आहे. हस्तगत करण्यात आलेली स्फोटके   आगामी विधानसभा निवडणुकीत घातपाती कारवाया करण्यासाठी वापरली जाणार होती, असे सांगण्यात येत आहे. हा आरडीएक्सचा साठा गावाच्या मुख्य रस्त्यालगतच्या शेतात लपवून ठेवण्यात आला होता. 

स्फोटके जप्त केल्यानंतर विशेष कार्य पथकाने (एसटीएफ) संपूर्ण गावात शोध मोहीम सुरू केली आहे. या साठ्याची माहिती मिळताच विशेष पोलीस अधीक्षक  राकेश कौशल आणि इतर अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. भारत-पाकिस्तान सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे गाव आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बॉम्बविरोधी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

तीन दिवसांत अडीच किलो स्फोटके जप्त

पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. 'इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन'च्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर, पंजाब पोलिसांनी तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणांहून अडीच किलो आरडीएक्स जप्त केले आहे. या सोबतच एक डिटोनेटर, कोडेक्स वायर, ५ फ्यूज, एके-४७ रायफल आणि १२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) व्ही के भावरा यांनी सांगितले की, गुरुदासपूरमधील लखनपाल गावातील रहिवासी अमनदीप कुमार उर्फ ​​मंत्री याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या स्फोटकांबाबत माहिती मिळाली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. पठाणकोटमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या दोन घटनांमध्ये तो मुख्य आरोपी आहे. पोलीस अधीक्षक कंवरदीप कौर यांनी सांगितले की, अमनदीपने तोंड उघडल्यानंतर पोलीस पथके गुरुदासपूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली. अमनदीपच्या म्हणण्यानुसार ही सामग्री 'आयईडी' बनवण्यासाठी वापरली जाणार होती. अमनदीपला आयएसवायएफ (रोडे) चा स्वयंघोषित प्रमुख लखबीर सिंग रोडे याने त्याचा साथीदार सुखप्रीत सिंग उर्फ ​​सुख यांच्यामार्फत पोहोचविण्यात आला. लखबीर सध्या पाकिस्तानात राहून पंजाबमधील दहशतवादी कारवायांचे नियोजन करीत आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या सहा आयएसवायएफ कार्यकर्त्यांपैकी अमनदीप उर्फ ​​मंत्री हा एक आहे. या आरोपींनी पठाणकोट आर्मी कॅम्पसह पठाणकोटमध्ये दोन ग्रेनेड हल्ले केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सहा हातबॉम्ब, एक पिस्तूल, एक रायफल तसेच काडतुसे आणि मॅगझिन जप्त केले आहे. लखबीर रोडेने जून २०२१ पासून पंजाब आणि इतर देशांमध्ये दहशतवादी जाळे पसरविण्यास सुरुवात केली आहे. आरडीएक्स, टिफिन आयईडी, आयईडी बनवण्यासाठी स्फोटक साहित्य, हातबॉम्ब, घटक शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सीमेपलीकडून पाठविण्यात आले आहे. प्रामुख्याने ड्रोन आणि सीमा पार तस्करी करणाऱ्यांच्या माध्यमातून ही सामग्री भारतात आणण्यात आली आहे. 

Share this story