एकमेकांना भिडणार राज्य सरकार आणि 'एनआयए'

NIA Vs ATS

मुंबई/ प्रतिनिधी 

सन २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र सरकार हे एकमेकांना भिडण्याची लक्षणे दिसत असून साक्षीदार उलटल्याबाबत काळजी व्यक्त करीत राज्य सरकार आपला स्वतंत्र वकील नियुक्त करेल आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) वतीने न्यायालयात उपस्थित असेल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास 'एनआयए' करीत असून त्यापूर्वी राज्याच्या 'एटीएस'ने हा तपास केला आहे. प्रत्यक्षात खटला उभा राहिल्यानंतर सुनावणीदरम्यान अनेक साक्षीदार उलटले आहेत. एका साक्षीदाराने तर 'एटीएस' आणि अन्य तपास यंत्रणांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.  

दि. २८ डिसेंबर २०२१ च्या सुनावणीत या साक्षीदाराने 'एनआयए' विशेष न्यायालयात सांगितले की, आधी 'एटीएस'ने आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आपला छळ केला. आणि या प्रकरणातउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, इंद्रेश कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अन्य चार जणांची नावे गोवण्यासाठी आपल्याला धमकी देण्यात आली. ही नावे सांगण्यासाठी आपल्यावर दबाव निर्माण व्हावा म्हणून आपल्याला दीर्घकाळ बेकायदेशीरपणे एटीएस कार्यालयात बसवून ठेवण्यात आले, असा आरोपही त्याने केला आहे. 

परमबीर सिंग यांच्यावर केला आरोप 

एटीएस मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करीत असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्तीवर होते  आली होती. परमबीर सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनीच आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या लोकांची नावे घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यासाठी आपल्याला मारहाण करण्यात आली. तसेच आपला मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप या साक्षीदाराने केला आहे. परमबीर सिंग यांच्यावर सध्या भ्रष्टाचार आणि खंडणीचे अनेक खटले दाखल आहेत. 

Share this story