बँकेच्या चुकीने जमा झालेले पैसे खातेदार म्हणतो; मोदींनी दिले

PM Narendra Modi

पाटणा/ वृत्तसंस्था 

बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने अनेकदा चुकीच्या खात्यात पैसे जमा होतात आणि बँका खाते गोठवून किंवा खातेदाराला नोटीस पाठवून ते परतही मिळवतात. मात्र, बख्तियारपूर येथील एका खातेदाराच्या खात्यात चुकीने जमा झालेले पैसे वसूल करणे ही बँकेसाठी डोकेदुखी बनली असून त्यासाठी खातेदार देत असलेले कारण मात्र एक नंबरी आहे. 

रंजन दास याच्या बचत खात्यात बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने ५ लाख ५० हजार रुपये मार्च महिन्यात जमा झाले. बँकेने परत मिळविण्यासाठी अनेकदा दास याला नोटीस बजावली. मात्र, या पठ्ठयाने बँकेला काही दाद लागू दिली नाही. अखेर बँकेने मानसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने दिलेले उत्तर पोलिसांनाही निरुत्तर करणारे ठरले आहे. 

रंजन दास म्हणतो की, मार्च महिन्यात माझ्या खात्यात जेव्हा ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जमा झाली तेव्हा मी खूप खूष झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. या १५ लाखाचा पहिला हप्ता माझ्या खात्यात जमा झाला अशी माझी समजूत झाली. ही रक्कम मी लगेच खर्च करून टाकली आहे. आता ही रक्कम परत करणे मला शक्य नाही, असा त्याचा दावा आहे.   
 

Share this story