उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा गेम प्लॅन

dcc-satara

पालकमंत्र्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात उत्सुकता

सातारा : गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये उपद्रवमूल्य दाखविणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांची यंदा निवांत राजकीय खेळी सुरू आहे . मात्र राष्ट्रवादीच्या तंबूत उदयनराजे यांना सोबत घ्यायचे की विरोधात उमेदवार द्यायचा हा राष्ट्रवादीचा मोठा गेम प्लॅन असणार आहे . यंदा सहकार क्षेत्राचा रिमोट आपल्या हाती ठेवणारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

यंदाची जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार ठरणार आहे . संचालक मंडळावर राष्ट्रवादीचा होल्ड असला तरी बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत . राजकारणाचे पक्षीय जोडे सहकारात बाजूला ठेवायचे असतात हे कितीही सांगितले गेले तरी शह- काटशहाच्या राजकारणाला वेग आला आहे . मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून गृहनिर्माण दूध उत्पादक संस्थेतून खासदार उदयनराजे भोसले हे बँकेत संचालक झाले . या मतदार संघातून उदयनराजे यांनी दोन टर्म संचालक म्हणून काम केले आहे . याच मतदारसंघात उदयनराजेंची राजकीय नाकेबंदी करण्याची राष्ट्रवादी नेत्यांचे मनसुबे आहेत . उदयनराजे पुन्हा गृहनिर्माण मधून इच्छुक असून सातारा कराड तालुक्यात सर्वाधिक एकूण 272 ठरावापैकी सर्वाधिक ठराव आहेत . कराडमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे . उमेदवार निश्चितीच्या हालचाली विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर करणार आहेत . रामराजे - शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी उदयनराजे राजघराण्याचे जिव्हाळ्याचे नाते असले तरी राजकीय संबंध मधुर नाहीत . आणि उदयनराजेंकडून गतवर्षी झालेल्या पराभवाची दुखरी सल बाळासाहेबांच्या मनात आहे . तत्कालीन घटनांचे आंतरविरोध एकत्र जुळून आल्याने यंदाची निवडणूक उदयनराजे यांच्यासाठी सोपी नसणार हे लक्षात येत आहे . गतवर्षी पंचवार्षिक निवडणुकीला उदयनराजे यांच्या विरोधात फलटण चे नेते महानंद चे संचालक डी के पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता . यंदाही या मतदारसंघातून राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार ? याची राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. 000

Share this story