संघ आणि भाजप हे ढोंगी हिंदू: राहुल गांधी यांचा आरोप 

Rahul Gandhi

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष हे खरे हिंदू नाहीत. ते केवळ हिंदू धर्माचा स्वार्थी राजकारणासाठी उपयोग करून घेणारे ढोंगी आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नोटबंदी आणि वस्तू व सेवा कराचा उल्लेख करून, भाजप आणि संघाने लक्ष्मी शक्ती आणि दुर्गा शक्तीला दाबून ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे ही ते म्हणाले. 

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भाजप, संघ आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली. भाजप स्वतःला हिंदू पक्ष म्हणवून घेतो. मात्र, दुर्गा आणि लक्ष्मी या देवतांच्या सामर्थ्याला थोपविण्याच्या कारवाया त्यांच्या सरकारकडून केल्या जातात. संघ आणि भाजप हे खरे हिंदू नाहीत तर हिंदू धर्माचा वापर करून घेणारे ढोंगी हिंदू आहेत, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या काळात संपूर्ण देश भयाच्या छायेत आहेत शेतकरी भयग्रस्त आहेत. महिला भयग्रस्त आहेत. संघात स्त्री शक्तीला स्थान नाही. काँग्रेसमध्ये मात्र महिलांना बरोबरीचे स्थान दिले जाते, असा दावा करून राहुल गांधी म्हणाले की, मागील एक दोन शतकात हिंदू धर्माचे तत्व खऱ्या अर्थाने कोणी जाणले आणि आपल्या आचरणात आणले असेल तर ते महात्मा गांधी यांनी! ही गोष्ट आमच्याप्रमाणेच संघ आणि भाजपचे लोकही मान्य करतात. गांधीजीं अहिंसेचे तत्व खऱ्या अर्थाने जगले. अहिंसा हा हिंदू तत्वज्ञानाचा पाया आहे. असे असूनही संघ विचार मानणाऱ्यांकडून गांधीजींना का गोळ्या घालण्यात आल्या, याचा विचार तुम्ही करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

'लढायचे पण प्रेमाने' 

सध्या देशात भाजप आणि संघ सत्तेवर आहे. संघ आणि भाजपबरोबर आपण कधीही जाऊ शकत नाही. त्यांची आणि आपली विचारसरणी वेगवेगळी आहे. काँग्रेसची विचारसरणी गांधी विचारांचे अनुकरण करणारी आहे. गोडसे, सावरकरांचे विचार आणि आपले विचार यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला त्यांच्याशी लढायचे आहे. मात्र, ही लढाई तिरस्काराने आपण लढू शकत नाही. ही लढाईही आपल्याला प्रेमाने लढायची आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. 
 

Share this story