'मी कुणाचा दलाल ते सर्वांनी आधी ठरवा'

Asaduddin Owesi

जौनपूर/ वृत्तसंस्था  

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक लढविण्याचा आणि ती देखील स्वतंत्रपणे कोणाशीही युती- आघाडी  न करता लढविण्याचा निर्णय ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाने (एमआयएम) घेतल्यापासून या पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांना इतर सर्वच पक्षांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. सर्वच पक्ष त्यांना आपल्या विरोधकांचा दलाल ठरवीत आहेत. या टीकेला उत्तर देताना ओवेसी यांनी मिश्कीलपणे भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस या पक्षांची खिल्ली उडवली आहे. मी नेमका कोणाचा दलाल आहे ते आधी ठरवा, असे त्यांनी या तिन्ही पक्षांना सुचवले आहे.        

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला सपाचा दलाल ठरवले आहे तर सपा मला भाजपचा दलाल मानतो. काँग्रेसने आमचा पक्ष इतर कोणत्या तरी पक्षाची 'बी टीम' असल्याची टीका करत आहे. मला या तिघांनाही सांगावेसे वाटते की एकदा सगळ्यांनी एकत्र बसा आणि मी नेमका कोणाचा दलाल आहे हे नक्की ठरवा, असे ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.     

मागील वर्षी बिहारच्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने एमआयएम हा 'मतेखाऊ' पक्ष असल्याची टीका केली होती. सीमांचल भागातील २० संवेदनशील मतदारसंघात एमआयएमने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या उल्लेखनीय आहे. या भागात पक्षाला ५ जागांवर विजय मिळला. मात्र, त्यामुळे काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मते फुटल्याने या भागात सरसकट विजय मिळविण्याचे काँग्रेसचे स्वप्न धुळीला मिळाले. 

बिहारच्या निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएमचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला आहे सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी मते खाणाऱ्या ओवेसी यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे विधान त्या वेळी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते. 
पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तर ओवेसी हे भाजपचे दलाल असल्याचा थेट आरोप केला आहे. 

ओवेसी हे सपाचे दलाल असल्याचे सर्वांनाच माहित झाले आहे. मात्र, आता ओवेसी यांच्या भडकाऊ भाषणांचा कोणताही प्रभाव राज्यात पडणार नाही. उत्तरप्रदेशात आता दंगली उसळत नाहीत, असे विधान योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नावावर लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. चाचाजान आणि अब्बाजानच्या अनुयायांनी हे लक्षात ठेवावे की भावना भडकावून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास सरकार कठोर पावले उचलेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Share this story