पं.दिनदयाल उपाध्याय यांचे विचार व कार्य प्रेरणादायी: कोश्यारी

Dinadayal Prabodhini

यवतमाळ/ प्रतिनिधी   

पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचे विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. पं. उपाध्याय यांचे विचार आणि कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

यवतमाळपासून जवळ असलेल्या निळोणा येथील दिनदयाल प्रबोधीनीला भेट दिल्यानंतर भारतरत्न नानाजी देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात कोश्यारी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर दिनदयाल प्रबोधनीच्या उपाध्यक्षा ज्योती चव्हाण व सचिव विजय कद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोश्यारी म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय हे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. एवढे मोठे व्यक्तीमत्व असतांना देखील ते साधेपणाने राहायचे. स्वत:ची कामे स्वत: करायचे. जेवढे ते साधे होते. तेवढीच त्यांची भाषा साधी होती. आपली संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातील फरक ते सहजपणे व सोप्या भाषेत सांगायचे.
समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शेवटच्या माणसाचे कल्याण झाले पाहिजे, हाच त्यांचा ध्यास होता, असे ते म्हणाले.

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेऊन यवतमाळ येथील ही दीनदयाल प्रबोधिनी काम करीत आहे, असे सांगून कोश्यारी म्हणाले, प्रबोधिनीचे कार्य प्रशंसनीय आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी प्रबोधिनी करीत असलेले कार्य गौरवास्पद आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे ही कोश्यारी यावेळी म्हणाले.

सभागृहात राज्यपाल कोश्यारी यांचे उपाध्यक्षा चव्हाण आणि सचिव कद्रे यांनी दिनदयाल पुस्तक, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भगिनींनी राज्यपालांचे भाऊबीजेनिमित्त औक्षण केले. संस्थेच्या कार्याची माहिती पॉवर पॉइंट सादरीकरणातून गजानन परसोडकर यांनी दिली.

कार्यक्रमाला आमदार ॲड. निलय नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे,डॉ. अशोक उईके, नामदेव ससाने, संजीव रेड्डी बोदकूरवार तसेच प्रबोधिनीशी संबंधित असलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार चव्हाण यांची मानले. राज्यपाल कोश्यारी यांचे दिनदयाल प्रबोधिनी परिसरात आगमन होताच शबरी अतिथीगृहासमोर पोलिस पथकाने मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी दिनदयाल प्रबोधिनीच्या मुख्य सभागृहातील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व परिसरात वृक्षारोपण केले.

Share this story