महाराष्ट्र दालनास ‘आयआयटीएफ’मध्ये उत्तम प्रतिसाद

Maharashtra

नवी दिल्ली/ प्रतिनिधी  

राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ)  विद्युत धोरण, स्टार्टअप व हस्तकलांच्या वस्तूंनी सज्ज महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्‍पनेवर सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. या दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. राज्याची समृध्द हस्तकला दर्शविणारे उद्योग समूह (क्लस्टर्स), बचतगट आदींचे उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्या वतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन) प्रगती मैदानावर सुरु असलेल्या ४० व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

विद्युतवाहन धोरण व स्टार्टअप्सचे आकर्षण

दालनाच्या दर्शनी भागात स्थित टाटा नेक्सॉन या चार चाकी विद्युत गाडीकडे ग्राहकांची ओढ दिसते. या गाडीत बसून तसेच गाडीचे निरिक्षण करून ही ग्राहक मंडळी राज्याच्या विद्युत धोरणाचीही माहिती घेत आहेत व आपल्या जिज्ञासा, शंका व प्रश्नांचे निरसण करून घेत आहेत. दालनाच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची उत्पादने व त्यांचे उत्तम सादरीकरण ग्राहकांची पसंती मिळवत आहे. आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमूठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली,ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट तर दालनाला भेट देणा-यांना येथेच थबकवते. पुणे येथील जीएमएस स्टार्टअप्सने तयार केलेल्या टायटेनियमपासून निर्मित, वजनाने हलक्या व आकर्षक सायकली, मुंबईच्या स्कायडॉक स्टार्टअपकडून तयार करण्यात आलेले आकर्षक ड्रोन व त्याचे ॲडव्हान्स फीचर जाणून घेण्यासही येथे गर्दी दिसत आहे. न्हाणीघरातील दुर्गंध बाहेर काढणारे खास यंत्रही (वॉशरुम ओडर फ्री इंन्ट्रुमेंट) येथे ग्राहकांच्या  पसंतीस उतरत आहे.

महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्र ‘मैत्री’, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘उमेद’, महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या ‘माविम’, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आणि खादी ग्रामोद्योग विभागाशी  संलग्न आठ उद्योग समुहांची  (क्लस्टर) उत्पादनेही येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्याची प्रसिध्द पैठणी साडी, सांगलीची प्रसिध्द हळद, कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणे, चंद्रपूर व गडचिरोलीचे अनुक्रमे कारपेट क्लस्टर आणि हस्तकलांचे स्टॉल्स, कुडाळ येथील वुडीग्रास हे बांबू पासून निर्मित फर्निचर व वस्तुंच्या स्टॉललाही या दालनास भेट देणाऱ्या ग्राहकांची पसंती मिळत आहे व ते विक्रीही करीत आहेत.

बृह्नमुंबई महानगरपालिकेचा स्टॉलही या दालनात उभारण्यात आला असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून गौरव असणा-या मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासाला चालणा देणारे कोस्टल रोड प्रकल्पाविषयी येथे सविस्तर माहिती व आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज व पर्यावरणपूरक अशी एक हजार एकरावर तयार होत असलेले औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉलही व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे.
 

Share this story