रिकामटेकड्या नगरविकास आघाडीला सातारा विकास आघाडीचा पोटशूळ

nagar-parishad-satara
मॅनेज पुरस्काराचा आरोप करणाऱ्यांनी सातारकरांची माफी मागावी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा घणाघात

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला सातारा विकास आघाडी कटिबद्ध आहे. नगर विकास आघाडीला विधायक काम नसल्याने रिकामटेकडे पणा आला आहे म्हणूनच त्यांना आमचा पोटशूळ उठल्याचा जोरदार घणाघात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

कचरामुक्त पुरस्कार मॅनेज आहे असा आरोप करणाऱ्यांनी सातारकरांच्या स्वच्छताप्रियतेचा अपमान केला असून त्यांनी समस्त शाहूनगरीची माफी मागावी अशी मागणी उपनगराध्यक्षांनी केली आहे. जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की बेफाम आरोप करणाऱ्यांनी सातारकर आणि शहराच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अवमान केला आहे. पुरस्कार मॅनेज नसतात त्यामागे संघटनात्मक प्रयत्न असतात. मुळे सातारा पालिकेच्या गुणांकनाची दखल घेण्यात आली याचा आरोप करणाऱ्यांनी अभ्यास करावा उगाच आपल्या अकलेचे तारे तोडू नये असा टोला उपनगराध्यक्षांनी लगाविला आहे. वरिष्ठ स्तराचे मूल्यांकन व सातारा पालिकेचे मेरिट अव्वलच आहे. कचरा संकलनाची जी पालिकेची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे सातारकरांच्या सामाजिक जवाबदारीतून शहर स्वच्छ राहण्यास मदत झाली त्यामुळे या पुरस्काराचा बहुमान सातारकरांचा आहे. सातारा विकास आघाडीचे हे यश नविआला खुपत असल्यानेच त्यांचे पदाधिकारी बिनबुडाचे आरोप करत आहेत.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा स्थायीसमितीसभा या योग्यवेळी बोलाविल्या जातीलच. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचेच हा सातारा विकास आघाडीचा दंडकच आहे. तशा स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी दिलेल्याच असून प्रत्येकवेळी सामान्यांच्या कामाचा निपटारा आम्ही गेल्या पाच वर्षात वेळोवेळी करत आलो आहोत. लोकविधायक कामेच विरोधकांना न उरल्याने ते रिकाम टेकडेपणातून आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांना आमचा पोटसूळ आल्यानेच त्यांची ही बडबड सुरू आहे. अमोल मोहिते यांनी अधिक टिवल्याबावल्या करण्यापेक्षा आपल्या वार्डातील विकास कामांकडे लक्ष द्यावे असा टोला पत्रकात शेवटी लगाविण्यात आला आहे. 000

Share this story