बावीस वर्षांनी पथदिव्यांनी उजळला महादरे रस्ता

mahadare-path-dive
नगरसेवक वसंत लेवे यांचा पाठपुरावा - सातारा विकास आघाडीची राजकीय पेरणी

सातारा : हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्‍या महादरे परिसराच्‍या विकासासाठी सातारा पालिका सरसावली आहे. वर्षानुवर्षे अंधारात रस्‍ता कापणाऱ्या महादरे ग्रामस्‍थांची अडचण दूर करण्‍यासाठी पालिकेने पुढाकार घेत सुमारे दीड किलोमीटर रस्‍त्‍यावर दोन दिवसांत ३५ दिवे बसवून ते कार्या‍न्‍वित केले. पथदिव्‍यांमुळे महादरेकडे जाणारा रस्‍ता रात्रीच्‍या वेळेस प्रकाशात उजळून निघत आहे.

यवतेश्‍‍वर आणि भैरोबा डोंगराच्‍या कुशीत वसलेल्‍या महादरे गावालगत मोठ्या प्रमाणात संरक्षित जंगल असून येथे वन्‍यप्राण्‍यांचा मोठ्या प्रमाणात मुक्‍त वावर असतो. आजूबाजूला शेती आणि दाट वनराईमुळे महादरेचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात नेहमीच खुलून दिसते. साताऱ्याशी भौगोलिक सलगता असूनही प्रशासकीय पातळीवर महादरेचा कारभार ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून सुरू होता. ग्रामपंचायतीस मिळणारा निधी व इतर तांत्रिक कारणांमुळे महादरे व परिसराच्‍या विकासावर मर्यादा येत होत्‍या. हद्दवाढीनंतर दरे खुर्द हा भूभाग पालिकेत आल्‍याने येथील नागरिकांना अपूर्ण विकासकामे मार्गी लागण्‍याची आशा निर्माण झाली.

या भागातील नागरिकांनी नगरसेवक वसंत लेवे यांची भेट घेत विकासकामे मार्गी लावण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याचे आवाहन केले. यानुसार श्री. लेवे यांनी पालिकेशी पत्रव्‍यवहार सुरू केला. महादरेला जोडणाऱ्या मुख्‍य रस्‍त्‍यावर पथदिवे नसल्‍याने नागरिकांची होणारी अडचण दूर करण्‍यास श्री. लेवे यांनी प्राधान्‍य देत त्‍यासाठीचा पाठपुरावा सुरू केला. श्री. लेवे यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे पालिकेने महादरे रस्‍त्‍याचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाअंती या मार्गावर ३५ खांब आणि दिवे बसविण्‍याचे पालिकेने ठरविले. यानुसार दोनच दिवसांत हे काम पूर्ण करून पालिकेने श्री. लेवे यांच्‍या मदतीने वर्षानुवर्षे अंधारात असणारा दीड किलोमीटरचा रस्‍ता उजळवून टाकला. हा मार्ग प्रकाशाने उजळून निघाल्‍याने स्‍थानिकांसह त्‍या भागात पहाटेच्‍या वेळी व्‍यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

महादरे तळ्याजवळ सुरक्षारक्षक महादरे तळे परिसरात असणाऱ्या पालिकेच्‍या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात समाजकंटकांकडून नुकसात होत असे. हे टाळण्‍यासाठी येथे सुरक्षारक्षक नेमण्‍याची मागणी नगरसेवक वसंत लेवे यांनी पालिकेकडे केली होती. यानुसार पालिकेने याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केला आहे. येत्‍या काही दिवसांत तळ्याचा संपूर्ण परिसर सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याच्‍या निगराणीखाली आणण्‍यात येणार असल्‍याची माहितीही लेवे यांनी दिली. 000

Share this story