१०० कोटी लसीकरणासाठी केंद्राने कसली कंबर 

Vaccination

नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांसह भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. त्यासाठी विशेष कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये विशेषतः आगामी वर्षात विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या राज्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे 

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत ९६ कोटी ७५ लाख डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाचा सरासरी वेग लक्षात घेता १०० कोटी लसींचा टप्पा सोमवार ते मंगळवारपर्यंत (दि. २१-२२) अथात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सध्या देशभरात सुरू असणारा सणासुदीचा हंगाम, दुर्गापूजा, नवरात्र यामुळे लसीकरणाचा वेग सरासरीपेक्षा काही प्रमाणात मंदावल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर दसऱ्यानंतर लसीकरणाला वेग देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

लसीकरणाच्या मैलाचा दगड गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या कृती आराखड्यातील नियोजनानुसार १०० कोटी लसींचा टप्पा गाठला जाताच भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघातील लसीकरण केंद्रांना भेटी देतील आणि डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांचा सन्मान करतील. १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणे हे केंद्रातील सरकारने कोरोनाच्या विरोधात दिलेल्या लढ्याचे यश असल्याचे नागरिकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. 

अशा उपक्रमांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे निमित्त मिळेल आणि ते कोरोना विरोधी लढ्याबरोबरच केंद्र सरकारची इतर कामे आणि योजना यांचा प्रचार- प्रसार करू शकतील. त्याचा फायदा पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या उत्तरप्रदेश, गुजरात आणि पंजाब अशा राज्यांमध्ये उठविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.      

Share this story