मोठ्या प्रवासी कारमध्ये अधिक एअरबॅग्ज अनिवार्य

नवी दिल्ली/ प्रतिनिधी
भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या चिंता दूर करून प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, आठ लोकांची वाहतूक करणाऱ्या मोटार वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये भर पडेल. वाहनाचा प्रकार किंवा किंमत काहीही असली तरी सुरक्षाविषयक सुविधा द्याव्याच लागतील आणि निर्बंधांचे पालन करावेच लागेल; असे गडकरी म्हणाले. दळणवळण मंत्रालयाने चालक आणि पुढच्या सीटवरील सहप्रवाशासाठी एअरबॅग्ज अनिवार्य केल्या आहेत.
'एम १' या वाहन श्रेणीमध्ये, पुढील आणि मागील दोन्ही भागांसाठी; तसेच पुढून किंवा मागून धडक बसली तरीही त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी चार अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य आहेत असा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्ते अपघातात वाढते मृत्यू
दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातांची नोंद होत असलेला भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. या रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात आणि आणि गंभीर जखमी होऊन अपंगत्व येण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. अनेक अपघातांमध्ये बहतूकविषयक नियमांचे उल्लंघन हे प्रमुख कारण मानले जाते. परंतु अपुरे सुरक्षा उपाय, विशेषतः लहान प्राथमिक स्तरावरील वाहनांमध्ये, हे देखील अपघाती मृत्यूचे महत्वाचे कारण आहे.